महाराष्ट्रामधे बारा कोसावर जशी बोली भाषा बदलते, त्याच पद्धतीने लोककलेची परंपरा,बाज,सादरीकरण आणि थाट बदलतो. या लोककलेची पालखी खांद्यावर घेतलेल्या लोककलावंताचं ध्येय हे केवळ मनोरंजन नाही. मराठी संस्कार, परंपरा, संस्कृती यांना चिरंजीवी ठेवण्याचं आहे. मौखिक परंपरेच अमृत पिऊन मराठी लोककला कित्येक शतके या मातीशी आणि माणसाच्या मनाशी नाळ जोडून जीवित आहे.
पण,एखादी सभ्यता किंवा संस्कृती जशी परकीय आक्रमणात नष्ट होऊन इतिहास होऊन जाते अगदी तेच चित्र या लोककलेच झालं. काही संस्कारशून्य पाश्चात्यकलेच गारुड या मराठी लोककलेवर आणि लोकमनावर पसरलं. त्यामुळे ही लोककला आणि तिची सभ्यता पूर्णपणे इतिहास होण्याच्या मार्गावर मार्गस्त होत चाललिये.
या मराठी लोककलेची, लोककलावंतांची आता शेवटची पीढी उरली आहे काय?
म्हणून, मराठी आख्यानकथा कलेचा मार्ग निवडून, गणा पासून गोंधळापर्यंत नवीन रचना आणि चाली बांधून,मराठी लोककलेला तोच मान, सन्मान,लोकाश्रय मिळऊन देण्यासाठी, तिच्या अस्सल मराठी संस्कारांची भुरळ पाडण्यासाठी, लोककलेचे सेवेकरी होऊन “तरुण कलाकारांची चळवळ उभी राहिलीये आणि ती म्हणजे "THE FOLK आख्यान” थाट ह्यो जूना खेळ हा नवा.